९ तारखेचा वायदा!
भाजप ३०, मित्र पक्षांना १८ जागा?
लोकसभा निवडणुकीत भाजपने २९ ते ३० जागा लढविण्याची तयारी केली असून शिवसेनेसाठी (शिंदे गट) १३ ते १४ आणि राष्ट्रवादीसाठी पाच जागा सोडण्याची तयारी दाखविली आहे.
मुंबई : लोकसभा निवडणुकीत भाजपने २९ ते ३० जागा लढविण्याची तयारी केली असून शिवसेनेसाठी (शिंदे गट) १३ ते १४ आणि राष्ट्रवादीसाठी पाच जागा सोडण्याची तयारी दाखविली आहे. दोन्ही मित्रपक्षांनी जास्त जागांची मागणी केली असली तरी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी त्यास ठाम नकार दिला आहे. त्यामुळे महायुतीच्या जागावाटपाचा निर्णय आता दिल्लीत, शनिवारी होणाऱ्या बैठकीत होईल.
राज्याच्या दौऱ्यावर आलेल्या शहा यांनी मंगळवारी रात्री शिवसेना व राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांची बैठक घेतली. त्यानंतर बुधवारी नवी दिल्लीला रवाना होण्यापूर्वी त्यांनी पुन्हा मित्रपक्षांच्या नेत्यांशी चर्चा केली. शिवसेनेने १८ ते २० आणि राष्ट्रवादी काँग्रेसने १० ते १२ जागांची मागणी केली असली तरी शिंदे गटाकडील विद्यामान १३ खासदारांच्या जागांव्यतिरिक्त एखादीच जागा सोडण्याची भाजपची तयारी आहे. ठाकरे गटाकडे असलेल्या खासदारांपैकी रत्नागिरी-सिंधुदुर्गची जागा केंद्रीय मंत्री नारायण राणे, दक्षिण मुंबईची जागा विधानसभा अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर आणि छत्रपती संभाजीनगरची जागा मंत्री भागवत कराड किंवा अतुल सावे यांच्यासाठी भाजपला हवी आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला चार ते पाच जागा दिल्या जातील. गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीने बारामती, शिरुर, सातारा आणि रायगड या चार जागा जिंकल्या होत्या. त्यापैकी केवळ रायगडचे खासदार सुनील तटकरे अजित पवारांबरोबर आहेत. जागावाटपाचा अंतिम निर्णय भाजप पक्षश्रेष्ठी शनिवारपर्यंत घेतील. त्यासाठी शिंदे आणि पवार यांना नवी दिल्लीत बोलावले जाण्याची शक्यता आहे.