अरे बापरे…कारवाईच्या भितीने एका रात्रीत २०० ट्रक रेतीसाठा रात्रीतुन गायब ?
जीपीएस आणि कॅमेऱ्यांनी नियंत्रण कक्षात झाली नसेल का नोंद ?
प्रसारमाध्यमांच्या अवैध रेती उपस्याच्या बातम्यांवर शिक्कामोर्तब ?
जीपीएस आणि कॅमेरे ठरले बुजगावणे ?
घाटातील कॅमेरा बंद : एका ट्रक मध्येच जीपीएस कॅमेरा उर्वरीत ‘धकाव रे शामराव‘ ?
तालुका प्रतिनिधी
धामणगाव रेल्वे: धामणगांव रेल्वे शासकीय रेती डेपो च्या कर्मकहाणीचा पाढा वृत्तपत्र प्रसार माध्यमांनी वाचणे सुरु केल्यानंतर जिल्हा प्रशासन खडबडून जागे झाले असुन कारवाईच्या भितीने धामणगांव रेल्वे तालूक्यातील शासकीय रेती डेपो मध्ये असलेला शेकडो ब्रास रेतीसाठा एका रात्रीतुन गायब केल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. दरम्यान सतत टिका होत असलेला माती व दगड धोंडे मिश्रीत रेतीसाठा सुध्दा रेतीमाफीयांनी रातोरात लांबविला असल्याने प्रशासन कडून होणाऱ्या कारवाईची खबर लागल्याने च सदरची धावाधाव सुरु असल्याचे तालूक्यात बोलल्या जात आहे. दरम्यान एरवी कर्तव्यतत्परतेचा ढोल बडविणाऱ्या तालूका महसुल प्रशासनाच्या जिपीएस आणि कॅमेरा नियंत्रण कक्षात हि बाब निदर्शनात आली नाही काय? आणि आली असेल तर प्रशासन काय कारवाई करणार प्रश्न खऱ्या अर्थाने उभा राहीला आहे.
धामगांव रेल्वे तालूक्यातील शासकीय रेती डेपो संदर्भात सर्वच प्रसारमाध्यमांनी पर्दाफाश करताच जिल्हा प्रशासन ॲक्टीव्ह मोडवर आले आहे. दरम्यान काल रात्रीपासुन धामणगांव रेल्वे तालूक्यातील शासकीय डेपोत असलेला शेकडो ब्रास रेतीसाठा हा ट्रक च्या माध्यमातून एका रात्रीतून रिकामा करण्यात येत आहे. तर दुसरीकडे तुम्ही ओके करा मग आम्ही कारवाई करतो अश्यतला हा प्रकार आहे. काय? अश्या शंकाकुशंकांना पेव फुटले असुन जिल्हा स्तरावरुन होणाऱ्या कारवाई पुर्वी च रेतीसाठा गायब करण्याचा हा प्रकार असल्याचे बोलल्या जात आहे. एकंदरीत जर कारवाई पुर्वीच रेतीमाफीयांना कारवाईची भनक लागत असेल तर मग कारवाईचा फार्स कशाला ? असा सवाल सामान्य नागरीकांकडून विचारला जात आहे.
—————————————————————
अवैध रेतीउपस्याच्या बातम्यांवर शिक्कामोर्तब!
तालूक्यातील शासकीय रेती डेपोचा पारदर्शी कारभार चव्हाट्यावर मांडताच रेती डेपो चालकाने व्हिडीओ शुटींग करीत घरकुल धारकांना नियमानुसार रेती देत असल्याचे व्हिडीओ सोशल मिडीयावर पसरवून ‘आम्ही कीती सोज्वळ‘ चा आव आणला होता मात्र एका रात्रीतून २०० च्या ट्रक चा रेती साठा उचलण्याच्या या प्रकाराने शासकीय रेती डेपोमधील कृष्णकृत्याचा भंडापोड झाला असुन जर नियमानुसार शासकीय रेती डेपो सुरु होता तर एका रात्री इतका साठा गायब करण्याचे कारण काय? आणि जर रेतीसाठा अवैध होता तर त्यावर कारवाई का झाली नाही ? हे प्रश्न निर्माण झाले आहे. एकंदरीतच या संपूर्ण प्रकारामुळे प्रसार माध्यमांनी छापलेल्या अवैध रेती उपस्याच्या बातम्यांवर शिक्कामोर्तब झाल्याचे सिध्द होत आहे.
—————————————————————
एका ट्रकवर जीपीएस कॅमेरा उर्वरी वाहने ‘धकाव रे श्यामराव‘
महाराष्ट्र शासनाच्या महसुल व वनविभाग मंत्रालयाद्वारे दिनांक ९ फेब्रुवारी २०२४ रोजी पत्र क्र. गौखनि-१०/०९२३/प्र.क्र.५३ख-१ मध्ये अवर सचिव यांनी सर्व विभागीय आयुक्तांना दिलेल्या स्पष्ट निर्देशानुसार नदीपात्र ते वाळू डेपो पर्यंत वाहतुक करणाऱ्या सर्व वाहनांवर मेमोरी कार्ड व चिप युक्त सिसीटीव्ही बसविण्यात यावे असे सुचित केले आहे. मात्र एकाच वाहनावर कॅमेरा बसविला व उर्वरीत वाहने धकाव रे शामराव चा प्रकार सुरु होता. कारवाई बडगा दिसताच तडकाफडकी उर्वरीत चार वाहनांवर सीसीटीव्ही आत्ता बसविल्याची माहिती हाती आली आहे. एकंदरीत सर्वसामान्यांना निष्पण रेती पुरवठा व्हावा या हेतुने संपूर्ण यंत्रणेवर लक्ष ठेवणाऱ्यांनी केलेल्या अक्षम्य दिरंगाई व अर्थपूर्ण दुर्लक्षावर जिल्हाधिकारी काही कारवाई करतात का? हा खरा प्रश्न आहे.
————————————————————-
जीपीएस प्रणाली आणि कॅमेरे ठरले बुजगावणे ?
शासकीय रेती डेपोतुन नियमानुसार रेती पुरवठा व्हावा या करीता शासकीय रेती डेपोवर चार सीसीटीव्ही कॅमेरे तर नदीपात्रात सुध्दा कॅमेरे बसविण्याचे स्वष्प निर्देश आहेत. असे अतांना शासकीय वाळू डेपो वजन काट्यावर एक सीसीटीव्ही कॅमेरा बसविला आहे. दरम्यान तेथुन गेल्यानंतर टक्रमध्ये टाकल्या जाणाऱ्या अतिरीक्त वाळूची नोंद कुठेच होत नाही तर नदीपात्रात बसविलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे वायर वेगळे करुन ठेवल्याने एकंदरीत जीपीएस व कॅमेरे बुजगावणेच ठरल्याचे आपसुकच सिध्द होत असतांना वारंवार तपासणी करणाऱ्या तलाठी ग्रामसेवक व तहसीलदारांच्या हे लक्षात आले नाही त्यांनी अर्थपूर्ण दुर्लक्ष केले हा संशोधनाचा विषय आहे.
————————————————————-