आता अटल सेतूवरून ‘शिवनेरी’
एसटी महामंडळाने प्रायोगिक तत्त्वावर २० फेब्रुवारीपासून पुणे ते मंत्रालय (सकाळी ६.३० वाजता ) व स्वारगेट- दादर (सकाळी ७ वाजता ) या दोन शिवनेरी बस सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
मुंबई : शिवडी ते नाव्हाशेवा दरम्यान नव्या ‘अटल सेतू’वरून एसटीची शिवनेरी बस सुरू करण्यात येणार आहे. पुणे ते मंत्रालय आणि स्वारगेट ते दादर शिवनेरी बसमध्ये पूर्ण क्षमतेने प्रवासी बसतात. त्यामुळे या प्रवाशांचा वेळ वाचवण्यासाठी अटल सेतूवरून शिवनेरी बस मुंबई गाठणार आहे. त्यामुळे एवढ्याच तिकीट दरात पुणे-मुंबई-पुणे शिवनेरी बसचा प्रवास अधिक वेगवान होईल.
एसटी महामंडळाने प्रायोगिक तत्त्वावर २० फेब्रुवारीपासून पुणे ते मंत्रालय (सकाळी ६.३० वाजता ) व स्वारगेट- दादर (सकाळी ७ वाजता ) या दोन शिवनेरी बस सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या बस पुणे येथून निघून थेट पनवेल नाव्हाशेवा, शिवडी मार्गे मंत्रालय/दादर येथे पोहोचतील. परतीचा प्रवास सकाळी ११ व दुपारी १ वाजता याचमार्गे अनुक्रमे मंत्रालय व दादर येथून निघतील. यामुळे गर्दीच्या वेळी प्रवासाचा सुमारे १ तास वाचणार आहे. तिकीट दरामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. या बस फेऱ्या अर्थात एसटीच्या अधिकृत मोबाइ ॲपवर व एसटीच्या संकेतस्थळावर आगाऊ आरक्षणासाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत.