आपल्याला जे हवे ते इतरांना मिळवून देण्याची क्षमता ठेवावी
–पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील
अमरावती, दि.21 (जिमाका) : प्रशासनामार्फत नागरिकांना सर्व आवश्यक कागदपत्रे वेळेत उपलब्ध व्हावीत, यासाठी शासनामार्फत विविध उपक्रम राबविण्यात येतात. तालुकास्तरीय प्रशासकीय इमारतीच्या निर्मितीमुळे आता नागरिकांना एका छताखाली महसूल विभागातील विविध कार्यालयांशी संपर्क साधता येणे, सोपे होणार आहे. प्रशासनात काम करताना आपल्याला जे हवे ते इतरांना मिळवून देण्याची क्षमता ठेवावी व त्या दृष्टीने प्रयत्न करावे, असे आवाहन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, वस्त्रोद्योग, संसदीय कार्ये मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांनी आज येथे केले.
मोर्शी रोड, अमरावती येथील तालुकास्तरीय प्रशासकीय इमारतीचे लोकार्पण पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. खासदार डॉ. अनिल बोंडे, खासदार नवनीत राणा, आमदार प्रवीण पोटे-पाटील, माजी महापौर चेतन गावंडे, निवेदिता दिघडे यांच्यासह विभागीय आयुक्त डॉ .निधी पांडेय, जिल्हाधिकारी सौरभ कटियार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता गिरीश जोशी, मनपा आयुक्त देविदास पवार, अपर जिल्हाधिकारी सुरज वाघमारे, अधीक्षक अभियंता रूपा गिरासे, उपविभागीय अधिकारी अनिल भटकर, तहसीलदार विजय लोखंडे आदी यावेळी उपस्थित होते.
पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले, महसूल विभाग हा प्रशासनाचा आत्मा आहे. नागरिकांना विविध कामांसाठी तसेच कागदपत्रांसाठी तहसील कार्यालयात यावे लागते. यामुळे नागरिकांच्या सुविधेसाठी एका छताखाली महसूल विभागाची कार्यालये असल्यास नागरिकांचा वेळ आणि पैशाची बचत होते. या दृष्टीने या प्रशासकीय इमारतीची निर्मिती सर्व नागरिकांसाठी सोयीची झालेली आहे. या प्रशासकीय इमारतीमध्ये महसूल कार्यालय व तत्सम निगडित असलेल्या कार्यालयांचा समावेश आहे. इमारतीमध्ये असलेल्या कॉन्फरन्स हॉलमुळे प्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध झाली आहे. नागरिकांना आवश्यक ती कागदपत्रे वेळच उपलब्ध व्हावीत, यासाठी शासन विविध उपक्रम राबवित असते. आता नागरिकांना घरी बसून सातबारा ऑनलाइन मिळतो. याप्रमाणे येत्या काळात नागरिकांना विविध शासकीय सुविधा अधिक सुलभतेने कशा मिळतील, यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचेही ते यावेळी म्हणाले.
तालुकास्तरीय प्रशासकीय इमारतीच्या मध्यभागी असलेल्या जागेवर डोमची निर्मिती करण्यासाठी लवकरच निधी उपलब्ध करून दिला जाईल. आगंतुकांसाठी आसनव्यवस्था, स्वच्छ पाणी आदी सुविधा उपलब्ध असाव्यात. शासकीय कार्यालयामध्ये नियमितपणे स्वच्छता राखण्यात यावी. नागरिकांची कामे वेळेत व्हावीत, यासाठी प्रशासनाचे अधिकारी, कर्मचारी यांनी सकारात्मकतेने काम करावे. तासिका तत्त्वावर काम करणाऱ्या प्राध्यापकांचे वेतन येत्या काळात वाढविण्यात येईल, असेही ते यावेळी म्हणाले.
तालुकास्तरीय प्रशासकीय इमारतीसाठी सर्व आवश्यक फर्निचर, साहित्य पालकमंत्री श्री. पाटील यांनी वेळेत उपलब्ध करून दिले. तसेच अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे पीक विम्याचे दहा कोटी रुपये मंजूर करून दिल्याबद्दल खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी पालकमंत्री महोदय यांचे यावेळी आभार मानले. तसेच अमरावती जिल्ह्यात पीएम विश्वकर्मा योजनेतंर्गत 5 हजार प्रकरणे मंजूर झाली आहेत. राज्यामध्ये यात अमरावती जिल्हा आघाडीवर आहे. यासाठी त्यांनी जिल्हाधिकारी श्री. कटियार यांचे अभिनंदन केले. मोझरी विकास आराखड्यातंर्गत मोझरी येथील इमारत पूर्ण झाली आहे. येत्या काळात मोझरी विकास आराखड्यातंर्गत पुढील कार्यवाही लवकर करण्यात यावी, अशी मागणीही डॉ. बोंडे यांनी केली.
खासदार नवनीत राणा यांनी तालुकास्तरीय प्रशासकीय इमारतीच्या निर्मितीसाठी सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. तसेच अमरावती जिल्ह्यात चुर्णी तसेच वलगाव येथे तहसील कार्यालय निर्माण व्हावे, अशी मागणी केली. चुर्णी तालुक्यात 90 गावे येतात. तेथील नागरिकांना कामकाजासाठी चिखलदरा तहसील कार्यालयात यावे लागते. यामुळे नागरिकांचा वेळ जावून खर्च वाढतो. यामुळे नागरिकांच्या सुविधेसाठी चुर्णी आणि वलगाव येथे तहसील कार्यालय निर्माण व्हावे, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
आमदार प्रवीण पोटे-पाटील यांनी तालुकास्तरीय प्रशासकीय इमारतीच्या निर्मितीमुळे नागरिकांची कामे वेळेत आणि गतीने पूर्ण होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त केला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाधिकारी श्री. कटियार यांनी केले. या इमारतीच्या बांधकामासाठी सुमारे 14 कोटी खर्च करण्यात आले असून अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने इमारतीचे बांधकाम करण्यात आले आहे.
प्रशासकीय इमारतीच्या तळमजल्यावर महसूल, सेतू कार्यालय, मुद्रांक कार्यालय, लोक अदालत, तहसीलदार, भूमि अभिलेख तालुका निरीक्षक, तहसील कार्यालय, महसूल कार्यालय तसेच उपकोषागार कार्यालयाचा समावेश आहे. तसेच पहिल्या मजल्यावर उपविभागीय अधिकारी, उपविभाग कार्यालय, तालुका निबंधक कार्यालय, उपनिबंधक कार्यालय, प्रादेशिक वन कार्यालय, तालुका कृषी अधिकारी तसेच सभागृहाचा समावेश असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
कार्यक्रमाचे संचालन श्रीकृष्ण पखाले यांनी तर आभार उपविभागीय अधिकारी श्री. भटकर यांनी मानले