पण विमानातल्या ‘त्या’ मृतदेहाबाबत कोणाला कळलंच नाही…
चिलीच्या दिशेने जाणाऱ्या विमानात एका नागरिकाचा मृत्यू झाला. संपूर्ण प्रवासात याबद्दल कोणालाच समजलं नाही. मात्र विनमान लँड झाल्यानंतर सर्वांना याबद्दल समजलं आणि मोठा धक्काच बसला.
दीड तासाचा प्रवास… पण विमानातल्या ‘त्या’ मृतदेहाबाबत कोणाला कळलंच नाही…
माणसाचं आयुष्य अतिशय क्षणभंगुर असतं. एका क्षणी आपण आनंदात असतो, पण पुढल्या क्षणी काय होईल सांगता येत नाही. याचाच प्रत्यय विमानातील काही नागरिकांना आला. 24 फेब्रुवारी रोजी एक ब्रिटीश नागरिक त्याच्या पत्नीसह विमानात बसला. त्याला फॉकलंड आयलंडवरून चिलीला जायचं होतं.मात्र विमानाचा हा प्रवास आपल्या आयुष्यातील शेवटचा प्रवास असेल याची त्याला कल्पनाही नव्हती. विमानाने टेक ऑफ केलं, प्रवास निर्धोक पार पडला. मात्र चिलीला हे विमान जेव्हा लँड झालं तेव्हा समोर आलेल्या धक्कादायक प्रकाराने एकच खळबळ माजली. त्या ब्रिटीश नागरिकाचा विमान प्रवासा दरम्यानच मृत्यू झाला होता. तब्बल दीड ते सर्वजण विमानासोबत प्रवास करत होते, पण कोणालाच काही कळल नाही. अखेर विमान लँड झाल्यावर त्या इसमाच्या मृत्यूबद्दल इतर प्रवाशांना समजलं आणि एक हलकल्लोळ माजला.
अखेर त्या इसमाचा मृत्यू झाला तरी कसा ?
Mirror च्या रिपोर्टनुसार, 59 वर्षांचा हा ब्रिटीश नागरिक त्याच्या पत्नीसह फॉकलंड बेटांवर फिरण्यासाठी आला होता. तेथून त्या दोघांना चिलीतील पुंता अरेनास येथे विमानाने जायचे होते. मग तिथून ते सँटियागोच्या दिशेने रवाना होणार होते. शनिवार, 24 फेब्रुवारी रोजी ते दोघेही चिलीच्या LATAM विमानातून प्रवास करू लागले. दोघेही फ्लाइटमध्ये चढले. विमानाने टेक-ऑफ केलं, तोपर्यंत सगळं काही ठीक होतं.
सर्व प्रवासी उठले पण…
विमान लँड होताच, सर्व प्रवासी आपापल्या जागेवरून उठू लागले. पण तो ब्रिटीश नागरिक काही त्याच्या सीटवरून उठला नाही. तो झोपला असेल असे त्याच्या पत्नीला वाटलं, तिने त्याला हाक मारली, उठवण्याचा प्रयत्न केला. पण तो काही उठला नाही. त्याचं शरीर थंड पडलं होतं आणि श्वासही सुरू नव्हता, हे त्याच्या पत्नीच्या लक्षात येताच ती हादरली. तिने मदतीसाठी हाका मारण्यास सुरूवात केली. तिचा आवाज ऐकून विमानातील क्रू-मेंबर्स तिथे आले. त्यांनी त्या इसमाला तपासले आणि त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित केसे. हे ऐकताच विमानातील इतर सर्व प्रवासी खूप घाबरले, कसेबसे सगळे जण विमानातून खाली उतरले आणि त्या इसमाचा मृतदेहही विमानातून उतरवण्यात आला.
विमानतळावर उपस्थित पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. तेथील स्पेशलिस्टच्या सांगण्यानुसार, त्या व्यक्तीचा मृत्यू आरोग्याशी संबंधित कारणांमुळे झाला. पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये ही बाब समोर आली. त्यांच्या पत्नीनेही याला दुजोरा दिला. माझा पती खूप आजारी होता, असे तिने नमूद केले. विमानातील तो दीड तास कोणीच विसरू शकणार नाही, अशीच ही घटना होती.