शिंदे गट लोकसभेच्या १८ जागांवर ठाम
खासदारांच्या बैठकीत निर्णय
गेल्या लोकसभा निवडणुकीत जिंकलेल्या सर्व १८ जागांवर दावा करण्याचा निर्णय शिवसेनेच्या शिंदे गटातील खासदारांच्या सोमवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला.
मुंबई : गेल्या लोकसभा निवडणुकीत जिंकलेल्या सर्व १८ जागांवर दावा करण्याचा निर्णय शिवसेनेच्या शिंदे गटातील खासदारांच्या सोमवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. जागावाटप लवकर निश्चित व्हावे म्हणजे प्रचाराला सुरुवात करता येईल, अशी भूमिकाही खासदारांनी मांडली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली संसदेच्या उभय सभागृहातील खासदारांची बैठक झाली. २०१९च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने १८ जागा जिंकल्या होत्या. सर्व खासदार शिंदे गटाबरोबर नसले तरी या १८ जागा मिळाल्या पाहिजेत, अशी आग्रही मागणी खासदारांकडून करण्यात आली. पक्षाचे खासदार असलेल्या जागा मित्र पक्षांसाठी सोडू नयेत, अशी भूमिकाही मांडली गेली. जागावाटपाची चर्चा आणि निर्णय घेण्याचे अधिकार मुख्यमंत्र्यांना देण्याचा ठराव या बैठकीत झाला. लोकसभा निवडणूक प्रचारात हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भर देण्याचा निर्णय घेण्यात आला. याशिवाय मुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यकाळात घेण्यात आलेले निर्णय, समृद्धी महामार्ग, अटल सेतूसारख्या पायाभूत सोयीसुविधा असे मुद्देही प्रचारात मांडण्यात येणार आहेत. जागावाटपावर भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गटात प्राथमिक चर्चा झाली आहे.
जागावाटपाचा तिढा
शिंदे गटाकडे सध्या १३ खासदार असून, तेवढ्या जागा देण्याची भाजपची तयारी आहे. अजित पवार गटालाही अधिकच्या जागा हव्या आहेत. भाजपला लढण्यासाठी किमान ३० जागा तरी हव्या आहेत. यामुळेच जागावाटप हा महायुतीत कळीचा मुद्दा ठरेल अशी चिन्हे आहेत.