चिंता वाढली
अमरावती विभागातील धरणांमध्ये ५१ टक्के पाणीसाठा
अमरावती विभागातील मोठ्या, मध्यम आणि लघू प्रकल्पां मध्ये ५१.४५ टक्के पाणीसाठा आहे. अमरावती शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या अप्पर वर्धा धरणात सध्या ६० टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.
अमरावती : यंदा पुरेसा पाऊस होऊनही फेब्रुवारीअखेर अनेक शहरांना पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांतील पाणीसाठा खालावला आहे. अमरावती विभागातील मोठ्या, मध्यम आणि लघू प्रकल्पां मध्ये ५१.४५ टक्के पाणीसाठा आहे. अमरावती शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या अप्पर वर्धा धरणात सध्या ६० टक्के पाणीसाठा शिल्लक आहेसध्या पाणी कपातीची शक्यता नसली तरी जून व जुलैमध्ये पाऊस किती पडतो यावर पाणीपुरवठ्याचे नियोजन ठरणार आहे. पावसाचे आगमन लांबल्यास मात्र पाणी कपातीची वेळ अनेक शहरांवर येऊ शकेल.बुलढाणा जिल्ह्यातील स्थिती गंभीर असून या ठिकाणच्या ४७ धरणांमध्ये १२७.८२ दशलक्ष घनमीटर म्हणजे २७.९० टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. उन्हाची दाहकता आता जाणवू लागली आहे. सिंचनासह घरगुती वापराच्या पाण्याची मागणी वाढली आहे. अमरावती विभागातील सर्व मोठ्या, मध्यम आणि लघू सिंचन प्रकल्पांमध्ये ५१.४५ टक्के पाणीसाठा आहे. गेल्या १ डिसेंबर रोजी विभागातील सिंचन प्रकल्पांमध्ये ७४.६४ टक्के पाणीसाठा होता. या तीन महिन्यांमध्ये पाणीसाठ्यात २३ टक्क्यांची घट झाली आहे.
अमरावती विभागात एकूण ९ मोठ्या प्रकल्पांमध्ये सध्या ७१६.७९ दशलक्ष घनमीटर म्हणजे ५१.२० टक्के पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी तो याच कालावधीत ६४ टक्के होता. विभागातील २७ मध्यम प्रकल्पांमध्ये सध्या ४२७.८५ दलघमी म्हणजे ५५.४४ टक्के जलसाठा आहे, गेल्या वर्षी तो ७३ टक्के होता. एकूण २४६ लघू प्रकल्पांमध्ये ४४१.६९ दलघमी म्हणजे ४८.४६ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत ६४ टक्के अशी स्थिती होती.उन्हाळ्यात नागरिकांना पाणी कपातीची चिंता भेडसावू लागते. गेल्या वर्षी पाऊस चांगला झाला व विभागातील शहरांना पाणीपुरवठा करणारी धरणे काठोकाठ भरली होती. ऑक्टोबरच्या अखेरीस धरणांमध्ये ९७ टक्के पाणीसाठा होता. त्यामुळे पाण्याची वर्षभराची चिंता मिटली असे वाटत होते. मात्र आता फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस धरणांतील पाणीसाठा निम्म्यावर आला आहे. पुरेसा पाऊस सुरू होईपर्यंत याच पाणीसाठ्यावर विभागातील शहरांची मदार असणार आहे