मित्राला लावला ६८ लाखांचा चुना
हॉटेल व्यवस्थापनाच्या नावाखाली मित्राला ६८ लाखांचा गंडा, अक्कलकोटमध्ये दागिने लंपास
मैत्री आणि विश्वासातून चालविण्यासाठी घेतलेल्या ऑर्केस्ट्रा बार प्रकरणात मूळ हॉटेल मालकाने मित्राची ६७ लाख ७२ हजार ५१२ रुपयांची आर्थिक फसवणूक केली आणि पुन्हा धमकी दिल्याचा प्रकार उजेडात आला आहे.
सोलापूर : मैत्री आणि विश्वासातून चालविण्यासाठी घेतलेल्या ऑर्केस्ट्रा बार प्रकरणात मूळ हॉटेल मालकाने मित्राची ६७ लाख ७२ हजार ५१२ रुपयांची आर्थिक फसवणूक केली आणि पुन्हा धमकी दिल्याचा प्रकार उजेडात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी संबंधित हॉटेलमालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.यासंदर्भात मल्लिनाथ नागप्पा सुतार (वय ४२, रा. कुंभारी, ता. दक्षिण सोलापूर) या फसवणूक झालेल्या व्यक्तीच्या फिर्यादीनुसार आशुतोष बाबासाहेब कराळे (वय ३२, रा. देगाव, सोलापूर) याच्या विरुद्ध फौजदार चावडी पोलीस ठाण्यात फसवणूक विश्वासघात केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.कराळे याच्या मालकीचे पुणे महामार्गावर बाळे येथे हॉटेल चॅम्पियन नावाचे ऑर्केस्ट्रा बार व परमीट बार आहे. सुतार आणि कराळे यांचे मैत्रीचे संबंध होते. कराळे याने हॉटेल चालविण्यास असमर्थता दर्शवून सुतार यांना हॉटेल चालविण्यासाठी गळ घातली. विश्वासामुळे होकार देत सुतार यांनी कराळे यांच्याशी दोन करार करून ३० लाखांची रक्कम अनामत म्हणून दिली. त्यानंतर हॉटेलचे नुतनीकरण व सुशोभिकरणासाठी ३७ लाख ७२ हजार रूपये खर्च केले. मात्र, पुढे काही दिवसांतच हॉटेलचा परवाना रद्द झाल्याचे सुतार यांना समजले. त्यामुळे त्यांनी कराळे यास विचारणा केली असता त्याने हॉटेल परवाना रद्द झाल्याची बाब दडवून ठेवल्याचे दिसून आले. एवढेच नव्हे तर त्याने पाच-सहा गुंडांसह हॉटेलमध्ये घुसून सुतार यांना धमकावत हुसकावून लावले. त्यांनी दिलेले संपूर्ण ६७ लाख ७२ हजार ५१२ रुपये परत न करता उलट, पुन्हा आलास तर पोलिसांत खोटे गुन्हे दाखल करून आयुष्य बरबाद करण्याची धमकी कराळे यांनी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.