भाजपच्या पहिल्या यादीत नितीन गडकरींचे नाव नसल्याने तर्कवितर्क

पक्षातील ज्येष्ठता आणि मंत्री म्हणून कामाचा अनुभव लक्षात घेता लोकसभा उमेदवारांच्या पहिल्या यादीत त्यांच्या नावाचा समावेश अपेक्षित होता. पक्षाच्या नेत्यांनी तसे संकेत दिले होते.
नागपूर : भारतीय जनता पक्षाने जाहीर केलेल्या लोकसभा उमेदवारांच्या पहिल्या यादीत केंद्रीय मंत्रीमंडळात पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्यासह पहिल्या फळीतील भाजप नेते व मंत्री नितीन गडकरी यांचे नाव नसल्याने महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लावले जात आहेत. गडकरी भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत. ते पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्षपदही भूषविले आहेत, मागील दहा वर्षात केंद्रीय मंत्री म्हणून सर्वाधिक छाप पाडणारे मंत्री म्हणून त्यांचा नावलौकिक आहे. शिवाय २०१४ आणि २०१९ या दोन्ही लोकसभा निवडणुकीत गडकरी यांनी नागपूरमधून प्रचंड मताधिक्याने विजय मिळवला आहे.त्यांची पक्षातील ज्येष्ठता आणि मंत्री म्हणून कामाचा अनुभव लक्षात घेता लोकसभा उमेदवारांच्या पहिल्या यादीत त्यांच्या नावाचा समावेश अपेक्षित होता. पक्षाच्या नेत्यांनी तसे संकेत दिले होते. नागपूरमध्ये येऊन गेलेल्या पक्ष निरीक्षकांचाही कल गडकरींच्या उमेदवारीबाबत सकारात्मक होता. विशे्ष म्हणजे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शनिवारी सकाळी पत्रकार परिषदेतही गडकरी हेच नागपूरचे उमेदवार असतील , असे स्पष्ट सांगितले होते. मात्र सायंकाळी पक्षाने जाहीर केलेल्या १९५ उमेदवारांच्या पहिल्या यादीत गडकरी यांच्या नावाचा समावेश नव्हता. ही बाब नागपूर आणि महाराष्ट्रातील भाजपच्या नेत्यांना धक्का देणारी ठरली.पक्षाच्या पहिल्या यादीत महाराष्ट्रातील एकाही उमेदवारांचा समावेश नाही, राज्यात महायुतीचे सरकार आहे व त्यांचे जागा वाटप अद्याप अंतिम झाले नाही, त्यामुळे गडकरीच नव्हे तर महाराष्ट्रातील एकाही जागेवरील उमेदवार जाहीर केला नाही, असे पक्षातर्फे सांगितले जात आहे. मात्र पक्षाने ‘अ’ आणि ‘ ड’ वर्गातील उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. नागपूरची जागा पक्षाच्या यादीत अ वर्गात आहे, मग गडकरींचे नाव त्यात का समाविष्ट केले गेले नाही, पहिल्या यादीत त्यांचे नाव असते तर राज्यातील कार्यकर्त्यांमध्ये लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चांगला संदेश गेला असता, अशी चर्चा भाजप वर्तुळात आहे.

मुख्य संपादक राहुल गौतम

Google Ad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या