जेव्हा नितीन गडकरी यांचे कार्यकर्ते संतापले
नितीन गडकरी हवे की दुसरा उमेदवार?
आगामी लोकसभेच्या निवडणुकीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हवे की दुसरा उमेदवार अशी विचारणा भाजपच्या निरीक्षकांनी स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांना केली. यावेळी सर्वांनी गडकरी हेच आमचे नेते आणि उमेदवार असल्याचे ठासून सांगितले. भाजपच्यावतीने सर्वच लोकसभा मतदारसंघात निरीक्षकांची नियुक्ती केली आहे. ते मतदारसंघात जाऊन स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांसोबत चर्चा करीत आहे.
सोबतच उमेदवारांविषयी मत जाणून घेत आहेत. गुरुवारी निरीक्षक खासदार मनोज कोटक आणि माजी आमदार अमर साबळे नागपूरला येऊन गेले. त्यांनी काही पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधला. भाजपची निवडणुकीची तयारी, उमेदवाराविषयी मत, विजयाची शक्यतासह विविध माहिती जाणून घेतली. नितीन गडकरी उमेदवार हवे की दुसरे अशी विचारणा निरीक्षकांनी केली. हा प्रश्न अनेकांना रुचला नाही. केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री म्हणून गडकरी यांची कामगिरी संपूर्ण देशाला ठावूक आहे. त्यांचा संपर्क, जनाधार, समाजकार्य, विकासकामे याविषयी विरोधकांनाही शंका नाही. त्यामुळे हा प्रश्चच नागपूरमध्ये उपस्थित होत नसल्याचे अनेकांनी ठणकावून सांगितल्याचे कळते.