पोलिसांच्या वाहनातून पळालेल्या दोन आरोपींना सुरतमध्ये अटक
मुंबई
भर रस्त्यात पोलिसांच्या गाडीतून पळ काढणाऱ्या दोन आरोपींना सुरत येथून अटक करण्यात नवघर पोलिसांना यश आले.
मुंबई: भर रस्त्यात पोलिसांच्या गाडीतून पळ काढणाऱ्या दोन आरोपींना सुरत येथून अटक करण्यात नवघर पोलिसांना यश आले. दोन्ही आरोपी सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर नवघर पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्ह्या दाखल आहे. दरम्यान, सुरत पोलिसांच्या मदतीमुळे या दोन्ही आरोपींना अटक करणे शक्य झाले.मोईन यामीन कुरेशी (२३) आणि शाहीद अली शहा (१९) अशी या आरोपींची नावे असून दोघेही गोवंडी परिसरातील राहणारे आहेत. महिनाभरापूर्वीं या दोघांवर नवघर पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. दोन्ही आरोपी ऑर्थर रोड कारागृहात शिक्षा भोगत होते. ५ मार्चला या दोन्ही आरोपींची जामिनावर सुटका होणार होती. याची माहिती मिळताच नवघर पोलिसांनी दोघांना ऑर्थर रोड येथून ताब्यात घेतले. त्यानंतर दोघांना पोलीस वाहनातून मुलुंड येथे आणण्यात येत होते.पोलिसांची गाडी घाटकोपरच्या छेडा नगर सिग्नलवर येताच दोन्ही आरोपींनी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन गाडीतून पळ काढला. याबाबत त्यांच्यावर टिळकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. परिसरातील सीसी टीव्ही कॅमेऱ्यामधील चित्रणावरून दोन्ही आरोपीलोकमान्य टिळक टर्मिनसवरून एका ट्रेनमधून जात असल्याचे आढळले. नवघर पोलिसांनी ही माहिती सुरत पोलिसांना दिली. पोलिसांनी सुरत रेल्वे स्थानकावरून या दोघांना ताब्यात घेतले. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.