मोठी बातमी
मोठी बातमी! अभिषेक घोसाळकरांच्या पत्नीच्या दाव्याने खळबळ
मुंबई | शिवसेना ठाकरे गटाचे नेते अभिषेक घोसाळकर (Abhishek Ghosalkar) यांची फेसबुक लाईव्ह सुरू असताना हत्या करण्यात आली होती. या घटनेमुळे सर्व महाराष्ट्र हादरला होता. हत्येनंतर दीड महिन्यांनी त्यांच्या कुटुंबियांनी आज पत्रकार परिषद घेतली.
या पत्रकार परिषदेत अभिषेक घोसाळकर (Abhishek Ghosalkar) यांचे वडील विनोद घोसाळकर, अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नी तेजस्वी घोसाळकर आणि मुंबई महापालिकेच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यासह वकीलही होते. यावेळी घोसाळकरांच्या पत्नीने खळबळजनक दावा केला आहे.
पत्रकार परिषदेत तेजस्वी घोसाळकर यांनी मोठा दावा केला. अभिषेक घोसाळकर (Abhishek Ghosalkar) यांची हत्या करणाऱ्या मॉरिस नरोनाने त्यादिवशी मलाही कार्यक्रमाला बोलावलं होतं. पण उशिर झाल्याने अभिषेक यांनी मला दुसऱ्या कार्यक्रमाला पाठवलं, असा दावा तेजस्वी घोसाळकर यांनी केला.
तेजस्वी घोसाळकर काय म्हणाल्या?
8 फेब्रुवारीला माझ्या पतीची हत्या झाली. त्याची वस्तुस्थिती सांगण्यासाठी बोलावलंय. हत्या झाली त्याचा योग्य तपास होत नाहीय. अमरेंद्र मिश्रा आणि मेहुल पारीख यांचा वावर याबाबत आयुक्तांना तपास करण्यासाठी सांगितलं होतं. 5 मार्च रोजी न्यायालयाने जे निरीक्षण नोंदवलं ते महत्त्वाचे आहेत. मॉरिस आणि मिश्रा याने सोबत बुलेट खरेदी केले, ती गन त्याची होती, मोरीसला त्याचा अॅक्सिस होता, असं तेजस्वी घोसाळकर यांनी सांगितलं.
आम्ही जमा केलेल्या गोष्टी आणि इतर पुरावे पोलिसांकडे दिलेले आहेत आणि तपासाची मागणी केलेली होती. सीसीटीव्ही दिले होते आणि अज्ञात आरोपींचा शोध घेण्याची मागणी केलेली होती. मॉरिसला अमरेंद्र मिश्राने गन दिल्याचं स्पष्ट आहे. दोघांनी मिळून बुलेट खरेदी केल्या होत्या, असं त्यांनी सांगितलं.
अभिषेक आणि मॉरिस यांच्यात असणारे वाद मिश्राला माहिती होतं. त्या दिवशी अभिषेकला ज्या कार्यक्रमाला बोलावलं त्याच कार्यक्रमाला मलाही बोलवण्यात आलेलं होतं. माझ्या दोन मुलांचे भविष्य, माझं कुटुंब उद्ध्वस्त झालंय. हायकोर्टाला एवढीच विनंती त्यांनी लवकर याचा निकाल लावावा, अशी मागणी तेजस्वी घोसाळकर यांनी केली.