सावधान! महिला चोरटी टोळी सक्रिय?
चोरट्या महिला टोळीचे आता रेल्वेस्थानक टार्गेट, दोघींना आरपीएफने केले गजाआड
गर्दीच्या ठिकाणी महिलांना घेरून त्यांच्याजवळची रोख तसेच माैल्यवान चिजवस्तू लंपास करणाऱ्या टोळीने आता रेल्वे स्थानक परिसराला टार्गेट केल्याचे उघड झाले आहे. पाच ते सात जणींच्या या टोळीतील दोघींना रेल्वे सुरक्षा दलाच्या पथकाने रविवारी सायंकाळी ताब्यात घेतले.
गर्दीच्या ठिकाणी महिलांना घेरून त्यांच्याजवळची रोख तसेच माैल्यवान चिजवस्तू लंपास करणाऱ्या टोळीने आता रेल्वे स्थानक परिसराला टार्गेट केल्याचे उघड झाले आहे. पाच ते सात जणींच्या या टोळीतील दोघींना रेल्वे सुरक्षा दलाच्या पथकाने रविवारी सायंकाळी ताब्यात घेतले. लता जयदेव नाडे (वय ४०) आणि काजल कृष्णा नाडे (वय ३०) अशी अटक करण्यात आलेल्या महिलांची नावे आहेत. या दोघीही रामेश्वरी,अजनी भागात राहतात.
शहरातील अजनी, इमामवाडा तसेच कन्हान, कामठी आणि बुटीबोरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत महिला चोरट्यांच्या टोळ्या राहतात. ५ ते ७ जणी एकाचवेळी बाहेर पडून गर्दीच्या ठिाकणी जातात. खास करून, बाजारपेठ, बसगाड्या, रेल्वेगाड्यावर त्यांची वक्रदृष्टी असते. लगबगीने गाडीत चढण्याचा प्रयत्न करणाऱ्या महिलांच्या मागेपुढे होऊन त्या सावज म्हणून हेरलेल्या महिलांचे लक्ष विचलित करतात आणि तिच्या गळ्यातील सोन्याचे दागिने किंवा पर्समधील दागिने आणि रोख रक्कम बेमालूमपणे लंपास करतात.
रविवारी त्या नागपूर रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक १ वर सावज शोधत होत्या. त्यांचे संशयास्पद वर्तन पाहून तेथे कर्तव्यावर असलेले आरपीएफचे उपनिरीक्षक एल.एच. मिना, कर्मचारी मनोजकुमार पांडे, कपिल झरबडे, नीरजकुमार आणि दीपा कैथवास यांनी त्यांच्यावर नजर रोखली. लता आणि काजल नाडेला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्या उलटसुलट उत्तरे देऊ लागल्या. आरपीएफच्या ठाण्यात नेऊन त्यांची पीएसआय अनुराधा मेश्राम यांनी चाैकशी केली असता त्या चोरीच्या ईराद्याने रेल्वे स्थानकावर आल्याचे स्पष्ट झाले. त्यांनी ८ मार्चला गाडी क्रमांक १२१५९ जबलपूर सुपरफास्ट एक्सप्रेसमध्ये चढणाऱ्या एका महिलेच्या पर्समधून ७ हजारांची रोकड चोरल्याची कबुली दिली. या चोरीच्या संबंधाने रेल्वे पोलिसांकडे गुन्हा दाखल असल्याचे उघड झाल्यानंतर ठाणेदार आर. एल.मिना यांनी या दोघींना पुढील चाैकशीसाठी रेल्वे पोलिसांच्या हवाली केले.