बस आणि लॉरीची भीषण धडक; अपघातात चौघांचा मृत्यू, 30 जण जखमी
राष्ट्रीय महामार्ग १५० ए वर कर्नाटक महामंडळाच्या बसची आणि लॉरीची धडक झाली. आज सकाळी झालेल्या य़ा अपघातात चौघांचा जागीच मृत्यू झाला आहे.
चित्रदुर्ग : कर्नाटक महामंडळाची बस आणि लॉरीची धडक होऊन भीषण अपघात झाला आहे. या अपघातात ४ जण ठार झाले असून ३० जण जखमी झाले आहेत. रायचूरवरून बंगळुरूला जाणाऱ्या बसला अपघात झाला. कर्नाटकातील चित्रदुर्ग जिल्ह्यातल्या गोल्लाहल्ली गावात ही भीषण दुर्घटना घडली.
अपघातात जखमी झालेल्यांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.याबाबत मिळालेली माहिती अशी की, अपघातात मृत्यू झालेल्यांमध्ये दोन पुरुष, एक महिला आणि एका मुलाचा समावेश आहे. मृतांची ओळख अद्याप पटलेली नाही. धडक इतकी भीषण होती की बसच्या एका बाजूचा चुराडा झाला आहे. त्या बाजूला बसलेल्या प्रवाशांना गंभीर दुखापत झाली आहे. अपघातानंतर लॉरी चालक घटनास्थळावरून फरार झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा करत आहेत.राष्ट्रीय महामार्ग १५० ए वर कर्नाटक महामंडळाच्या बसची आणि लॉरीची धडक झाली. आज सकाळी झालेल्या य़ा अपघातात चौघांचा जागीच मृत्यू झाला आहे. मृतदेह गाडीतून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. या घटनेमुळे महामार्गावर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत अपघातग्रस्त वाहन बाजूला केले. त्यानंतर वाहतूक सुरळीत झाली. अपघाताची नोंद पोलिसात झाली आहे. या प्रकरणी अधिक तपास केला जात आहे.