भरधाव शिवशाही बसने वाटसरूला उडवले
रोशन बन्सोड हा ११ एप्रिलच्या संध्याकाळी ६.३० वाजताच्या सुमारास वडधामनातील सारंग बार जवळून पायी रस्ता ओलांडत होता.
नागपूर: एसटी महामंडळाच्या शिवशाही बसची अमरावती रोडवरील वडधामना परिसरात रस्ता पार करणाऱ्या एका व्यक्तीला जोरदार धडक बसली. त्यात त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याने परिसरात तणाव निर्माण झाला होता. रोशन बन्सोड (४२) रा. सुर्या रोड लाईन्स, वार्ड क्र. १, सुराबर्डी, वाडी, नागपूर असे अपघातात दगावलेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर विजय निखाडे (४३) रा. बुट्टीबोरी, जि. नागपूर असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांच्या माहितीनुसार रोशन बन्सोड हा ११ एप्रिलच्या संध्याकाळी ६.३० वाजताच्या सुमारास वडधामनातील सारंग बार जवळून पायी रस्ता ओलांडत होता. दरम्यान या मार्गाने जाणाऱ्या एसटीची शिवशाही बसने त्यांना जोरदार धडक दिली.बसच्या धडकेत रोशन बऱ्याच अंतरावर जाऊन आदळला. हा प्रकार बघून परिसरात खळबळ उडाली. येथे बघ्यांची गर्दी जमल्याने तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी वेळीच घटनास्थळ गाठल्याले अनुचित प्रकार टळला. दरम्यान जखमी रोशनला उपस्थितांनी नागपुरातील इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) हलवले. परंतु रोशनचा आधीच मृत्यू झाल्याचे पुढे आले. या प्रकरणात पोलिसांनी शिवशाही बसचा चालकावर गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतले आहे.