बारामतीत दिवसाढवळ्या पती-पत्नीचा खून
पवार अपार्टमेंटमध्ये आढळले मृतदेह
बारामती शहरात असलेल्या कसबा जामदार रोडवर खत्री पवार अपार्टमेंट आहे. या अपार्टमेंटमध्ये भरदिवसा पती पत्नीचा खून झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.बारामती शहरात दिवसाढवळ्या पती पत्नीचा खून झाल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. शहरात जामदार रोडवर असणाऱ्या खत्री पवार अपार्टमेंटमध्ये ही घटना घडलीय. सचिन वाघोलीकर आणि सारिका वाघोलीकर असं खून झालेल्या पती पत्नीचं नाव आहे. त्यांच्या शरिरावर वार केल्याच्या खुणा आहेत. तसंच हाताची नस कापल्याचं दिसून आलं आहे. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेतयाबाबत मिळालेली माहिती अशी की, बारामती शहरात असलेल्या कसबा जामदार रोडवर खत्री पवार अपार्टमेंट आहे. या अपार्टमेंटमध्ये सचिन महालिंग वाघोलीकर आणि त्यांची पत्नी सारिका वाघोलीकर राहत होते. त्यांच्या गळ्यावर वार असून हाताची नस कापलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आले आहेत. दोघांची हत्या कोणी केली? का ? केली याचा तपास पोलीस करत आहेत.भरदिवसा बारामती शहरात घडलेल्या या घटनेने खळबळ उडाली आहे. ही घटना घडली त्यावेळी त्यांची मुले कण्हेरी इथं देवदर्शनासाठी गेले होते. पोलिसात या प्रकरणी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास सुरू आहे. खूनाचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे. लुटमारीच्या उद्देशाने की घातपात याचा तपास पोलीस करत आहे. काही
महिन्यांपूर्वी बारामतीत लॉजवर महिलेचा खून झाला होता. त्यानंतर आता दाम्पत्याच्या खुनाच्या घटनेने खळबळ उडालीय.