आज महाराष्ट्रात हायअलर्ट!
घराबाहेर पडण्याआधी बातमी वाचाच; रेड अलर्ट जारी
राज्यातील काही भागांमध्ये तापमानाने चाळीशी ओलांडली असून उन्हाच्या झळा आणि उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत, तर काही ठिकाणी अवकाळी पाऊस हजेरी लावत आहे.गेल्या 3-4 दिवसांपासून विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पाऊस हजेरी लावत आहे. आजही राज्याच्या अनेक भागांमध्ये पाऊस आणि गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे. आज काही ठिकाणी रेड अलर्टही जारी करण्यात आला आहे.अकोला, वाशिम आणि यवतमाळ या तीन जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज आहे. यासोबतच या जिल्ह्यांमध्ये गारपिटीचाही इशारा हवामान विभागाने दिला आहे. यावेळी 50 ते 60 किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहण्याचाही अंदाज आहे.याशिवाय बुलडाणा, अमरावती, वर्धा, नागपूर या जिल्ह्यांमध्येही आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. इथेही वादळी वारा, विजांचा कडकडाट आणि पावसासह गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे कामाशिवाय घराबाहेर पडणं टाळा.विदर्भातील उर्वरित जिल्हे, संपूर्ण मराठवाडा, नगर, सोलापूर आणि सांगली जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. मराठवाडा आणि विदर्भामध्ये 10 ते 13 एप्रिल दरम्यान विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.पुणे शहरातील तापमानामध्ये दोन अंशांनी घट झाली आहे. 10 एप्रिल रोजी 38 अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदवलं गेलं. पुढील काही दिवस पुण्यातील तापमान हे स्थिर राहणार असून 15 आणि 16 एप्रिल रोजी पुण्यामध्ये हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.