पैनगंगा नदीपात्रात बुडून तिघांचा मृत्यू
मृतांमध्ये चुलतीसह दोन पुतणी, माहुर तालुक्यातील घटना
पूजेतील निर्माल्य विसर्जनासाठी गेलेल्या चुलती व दोन पुतणींचा पैनगंगा नदीपात्रातील खड्ड्यात बुडून मृत्यू झाला.
नांदेड : पूजेतील निर्माल्य विसर्जनासाठी गेलेल्या चुलती व दोन पुतणींचा पैनगंगा नदीपात्रातील खड्ड्यात बुडून मृत्यू झाला. माहूर तालुक्यातील पडसा नजीकच्या कवठा बाजार येथील ही हृदयद्रावक घटना शनिवारी सायंकाळी समोर आली. दरम्यान, या दुर्दैवी घटनेस नदीपात्रातील बेसुमार वाळू उपसा कारणीभूत असून याप्रकरणी तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी जबाबदार असल्याचा आरोप करत मृतांचे नातेवाईक व काही ग्रामस्थांनी कारवाईची मागणी केली. जोपर्यंत तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी हे घटनास्थळावर येणार नाही तो पर्यंत मृतदेहांना हात लावू देणार नाही असा पवित्रा घेतल्याने प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.प्रतीक्षा प्रवीण चौधरी (वय ३५), अक्षरा नीलेश चौधरी (११) व आराध्या नीलेश चौधरी (९) अशी मृतांची नावे आहेत. हे तिघे मृत ते पडसा गावानजीक असलेल्या विदर्भातील कवठा बाजार येथील रहिवासी आहेत. मृत तिघेही शनिवारी सायंकाळी पाचच्या सुमारास गावाशेजारी असलेल्या पैनगंगा नदीपात्रात पुजेतील निर्माल्य विसर्जनासाठी (बेलफुल वाहण्यासाठी) गेले होते. दरम्यान रेतीतस्करांकडून खोदलेल्या खड्ड्यात एका चिमुकलीचा तोल जाऊन ती डोहात पडली. तिला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी गेली. तिही बुडाली. हे पाहून काकू प्रतीक्षाने मदतीसाठी धाव घेतली. परंतू तीही बुडाली. घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी नदीपात्राकडे धाव घेतली. परंतू तिघींनाही वाचवता येऊ शकले नाही. दरम्यान, नदीपात्रात नातेवाईकांनी मृतदेहांसह ठिय्या मांडला असून जोवर तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी, घटनास्थळावर येणार नाही तोपर्यंत मृतदेहांना हात लावू देणार नाही, असा पवित्रा नातेवाईक व ग्रामस्थांनी घेतला आहे. याप्रकरणी रविवारी दुपारपर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता.