यवतमाळमध्ये भीषण अपघात, तहसीलदाराच्या कारची दुचाकीला धडक, चालक फरार, दोघांवर काळाचा घाला
दुचाकीला भरधाव कारं धडक दिल्यानं भीषण अपघात झाला. ज्या कारनं तरुणांच्या दुचाकीला धडक दिली, ती कार आर्णि येथील तहसीलदारांची असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
यवतमाळ : यवतमाळच्या (Yavatmal) दारव्हा तालुक्यात भीषण अपघातानं (Accident News Updates) संपूर्ण तालुका हादरून गेला. दिवसभराचं काम आटपून आपल्या घराकडे परतणाऱ्या दोन तरुणांवर काळानं घाला घातला आहे. दुचाकीला भरधाव कारं धडक दिल्यानं भीषण अपघात झाला. ज्या कारनं तरुणांच्या दुचाकीला धडक दिली, ती कार आर्णि येथील तहसीलदारांची असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. अपघातानंतर वाहनचालक घटनास्थळावरुन पसार झाला असून पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. यवतमाळच्या बोरी अरब येथून काम आटपून दोन युवक घराकडे परतत होते. त्यावेळी दुचाकी आणि चारचाकी कारचा भीषण अपघात झाला. शहराजवळ असणाऱ्या एका देवस्थानाजवळ मागून येणार्या कारनं धडक दिल्यानं एकाचा घटनास्थळावर तर दुसर्याचा दारव्हा उपजिल्हा रुग्णालयात मृत्यू झाल्याची घटना घडली. धडक दिलेली कार ही आर्णि तहसिलदार यांची असल्याचे माहिती समोर येत आहे. कारचालकाविरुद्ध पोलिसांकडून गुन्हा दाखल
अंकुश देवराव भोजने (25, रा. रामगाव) आणि तोरनाळा येथील श्रीकांत प्रमोद ठाकरे (24) असं मृत तरुणांची नावं आहेत. हे दोन्ही तरुण बोरी अरब येथून काम आटपून दुचाकीनं दारव्हाकडे येत असताना मागून भरधाव येणार्या एक्सयुव्ही कारच्या चालकानं दुचाकीला जोरदार धडक दिली. ही कार आर्णि येथील तहसीलदार परसराम भोसले यांची असल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. अपघातानंतर वाहनचालक घटनास्थळावरुन पसार झाला. कार चालकाविरुद्ध दारव्हा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
अपघाताला कारणीभूत असलेली कार ही तहसीलदार परसराम भोसले यांच्या मालकीचे असल्याचे प्राथमिक पोलीस तपासातून पुढे आले आहे. कार कोण चालवत होते? याचा शोध घेतला जात आहे. तूर्त या प्रकरणी पोलिसांनी कारच्या अज्ञात चालकाविरोधात अपघाताचा गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक धनंजय रत्नपारखी करत आहेत.