मुख्यमंत्री उद्या पुण्यात? कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यासाठी उद्या काय आहेत प्लॅन!

पुणे | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गुरुवारी सकाळी पुण्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. यावेळी ते कोरोना निर्मूलन आढावा बैठक घेणार आहेत. बैठकीत पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रात कोरोना संदर्भात करण्यात आलेल्या उपाययोजनांचीही माहिती घेतली जाईल. असे सूत्रांकडून सांगण्यात आले.

या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह विभागीय आयुक्त, पुणे जिल्हाधिकारी आणि आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित असणार आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री फक्त मुंबईतील परिस्थिती कशी नियंत्रणात आणली, याबद्दल पाठ थोपवून घेत आहेत अशी टीका भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी केली होती. इतकेच नाही तर पुण्याचे पालकमंत्री असलेले अजित
पवार कोरोना परिस्थिती हाताळण्यात पुण्यामध्ये अपयशी ठरले हे दाखवण्याचा तर मुख्यमंत्र्यांचा प्रयत्न नाही ना, असा सवाल देखील चंद्रकांत पाटील यांनी केला होता.

याचबरोबर, राज्य सरकार पुण्यावर अन्याय करत असल्याची टीका भाजपाचे नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपाच्या कार्यकारिणी बैठकीत केली होती. राज्यातील सरकार मुंबईकडे जितके लक्ष देते तितके पुण्याकडे देत नाही. पुण्यावर अन्याय केला जात आहे. पुण्यात क्वारंटाईन सेंटर, आयसीयू बेड वाढवण्याची गरज आहे. मात्र, पुणे, पिंपरी पालिकेला एकाही नव्या पैशाचे अनुदान राज्य सरकारने दिलेले नाही, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. त्यामुळे उद्धव ठाकरे यांचा उद्याचा पुणे दौरा महत्त्वाचा मानला जात आहे. यावेळी मुख्यमंत्री विरोधकांना उत्तर देणार का, याचीही उत्सुकता राजकीय वर्तुळात लागून राहिली आहे.

मुख्य संपादक राहुल गौतम

Google Ad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या