अटल सेतू आज-उद्या दहा तास बंद
रविवारी होणाऱ्या मुंबई मॅरेथॉनसाठी शनिवारी रात्री ११ ते रविवारी दुपारी १ वाजेपर्यंत अशा एकूण दहा तासांसाठी न्हावा – शिवडी सागरी अटल सेतूवरून अत्यावश्यक वाहने वगळता सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे.उरण : रविवारी होणाऱ्या मुंबई मॅरेथॉनसाठी शनिवारी रात्री ११ ते रविवारी दुपारी १ वाजेपर्यंत अशा एकूण दहा तासांसाठी न्हावा – शिवडी सागरी अटल सेतूवरून अत्यावश्यक वाहने वगळता सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली असल्याची माहिती नवी मुंबई वाहतूक विभागाने अधिसूचना काढून दिली आहे.त्यामुळे या मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे. यामध्ये पुण्यातून द्रुतगती आणि जुन्या महामार्गावरून मुंबईकडे येणारी वाहने गव्हाण फाटा मार्गे बेलापूर- वाशी मुंबई अशी तर जेएनपीटी आणि उरणहून मुंबईत जाणारी वाहनेही गव्हाण फाटामार्गे वाशी या मार्गाने वळविण्यात आली आहेत.या वर्षीची मॅरेथॉन ही पहिल्यांदाच नागरिकांचे आकर्षण ठरलेल्या अटल सेतूवर आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये मुंबई ते चिर्लेदरम्यान मॅरेथॉन होणार आहे. यासाठी ‘एमएमआरडीए’कडून वाहतूक विभागाकडे हा मार्ग बंद करण्याची मागणी केली होती. त्यानुसार ही प्रवेशबंदी जाहीर करणारी सूचना नवी मुंबई वाहतूक पोलीस आयुक्त तिरुपती काकडे यांनी काढली असल्याची माहिती न्हावाशेवा वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जी. बी. मुजावर यांनी दिली आहे.