अवकाळी, गारपिटीमुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवर पुन्हा संकट
अवकाळी, गारपिटीमुळे पिके आडवी; विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात प्रचंड नुकसान
वादळी वाऱ्यासह झालेल्या गारपिटीमुळे शेतीचे मोठे नुकसान झाले असून काढणीला आलेले रब्बीचे पीक हातातून जाण्याची भीती आहे.
मुंबई : पश्चिम विदर्भातील अमरावती, बुलढाणा, वाशिमसह मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर आणि जालना तसेच उत्तर महाराष्ट्रात जळगाव या जिल्ह्यांना सोमवारी रात्रीपासून अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा मोठा तडाखा बसला. वादळी वाऱ्यासह झालेल्या गारपिटीमुळे शेतीचे मोठे नुकसान झाले असून काढणीला आलेले रब्बीचे पीक हातातून जाण्याची भीती आहे.
वाऱ्याच्या चक्रीय स्थितीमुळे विदर्भातील काही जिल्ह्यांना हवामान विभागाने ‘ऑरेंज अॅलर्ट’ जारी केला होता. त्यानुसार सोमवारपासून अवकाळी आणि गारपिटीने पश्चिम विदर्भाला झोडपून काढले. अमरावती जिल्ह्यातील धारणी व चिखलदरासह नांदगाव खंडेश्वर, चांदूर रेल्वे आणि धामणगाव रेल्वे तालुक्यांना त्याची सर्वाधिक झळ बसली. वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर, कारंजा तालुक्यांतील काही भागांत गारपीट झाली तर, बुलढाणा जिल्ह्यातही पावसाने हजेरी लावली. जळगाव जिल्ह्यातील पारोळा, अमळनेर, चोपडा, चाळीसगाव, धरणगाव या तालुक्यांना तडाखा बसला. जालना जिल्ह्यातील भोकरदन आणि जाफराबाद तालुक्यात सोमवारी सायंकाळनंतर विजेच्या गडगडाटासह जोरदार गारपीट झाली. वीज पडल्याच्या वेगवेगळ्या घटनांत पल्लवी विशाल दाभाडे (वय २१) आणि शिवाजी गणपत कड (वय ३८) यांचा मृत्यू झाला. छत्रपती संभाजीनगरमध्येही अवकाळी पाऊस नुकसान करणारा ठरला. कन्नड तालुक्यात वीज पडून बैल मृत झाल्याचेही सांगण्यात येत आहे.