अर्थसंकल्पात विदर्भाला काय मिळाले
मिहानला १०० कोटी, अन् बरेच काही…
महायुती सरकारच्या निवडणूकपूर्व अंतरिम अर्थसंकल्पात विदर्भासाठी अनेक घोषणा करण्यात आल्या आहेत.
नागपूर : महायुती सरकारच्या निवडणूकपूर्व अंतरिम अर्थसंकल्पात विदर्भासाठी अनेक घोषणा करण्यात आल्या आहेत. नागपूरच्या मिहान प्रकल्पासाठी १०० कोटी रुपये तर सिंचनाचा अनुशेष दूर करण्यासाठी दोन हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी २०२४-२५ या वर्षासाठी अंतरिम अर्थसंकल्प मांडला. त्यात विदर्भासाठी अनेक तरतुदी करण्यात आल्या. विदर्भात सिंचन अनुशेषाचा मुद्दा अनेक वर्षांपासून गाजतो आहे. भाजप विरोधी पक्षात असताना या मुद्यावर ते पश्चिम महाराष्ट्रातील काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांवर टीका करीत असत. विशेषत: अजित पवार यांच्यावर त्यांचा रोष अधिक राहायचा. यावेळी पवार महायुतीत आहे व त्यांनी त्यांच्या अर्थसंकल्पात विदर्भातील सिंचन अनुशेष दूर करण्यासाठी २ हजार कोटींची तरतूद केली आहे. मूर्तिजापूर -यवतमाळ शकुंतला रेल्वे मार्गिकेसाठी होणाऱ्या खर्चात शासन ५० टक्के भार उचलणार आहे. भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द प्रकल्पात जलपर्यटन केंद्रासाठी निधी देण्यात आला आहे.
नागपूरच्या मिहान प्रकल्पासाठी १०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूरचेच असल्याने त्यांच्या जिल्ह्यातील प्रकल्पासाठी १०० कोटी रुपये देऊन या प्रकल्पाला चालना देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
विदर्भात सहा वैद्यकीय महाविद्यालये
विदर्भातील वाशीम, अमरावती, भंडारा, गडचिरोली, वर्धा व बुलढाणा जिल्ह्यात प्रत्येकी १०० विद्यार्थी क्षमतेचे वैद्यकीय महाविद्यालय आणि त्याला सलग्नित ४३० खांटांचे रुग्णालय सुरू करण्यात येणार आहे. त्याच प्रमाणे गोंदिया जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाशी सलग्नित प्रत्येकी १०० विद्यार्थी क्षमतेचे शासकीय परिचर्या महाविद्यालय सुरू करण्यात येणार आहे.