: १ एप्रिलला २००० च्या नोटा स्वीकारणार नाही
आरबीआयनं केलं जाहीर!
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं २ हजार रुपयांच्या नोटांचं वितरण याआधीच बंद केलं असून गेल्या वर्षीपासून बँकेच्या १९ शाखांमध्ये या नोटा बदलून देण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.गेल्या वर्षी २ हजाराच्या नोटा वितरणातून काढल्यानंतर आरबीआयनं आपल्या १९ शाखांवर या नोटा बदलून मिळण्याची सोय उपलब्ध करून दिली होती. त्यानुसार, त्या त्या शाखांवर जाऊन या नोटा ठराविक रकमेपर्यंत बदलून घेता येऊ शकतात. मात्र, येत्या १ एप्रिल रोजी आरबीआयच्या १९ शाखांमध्ये या नोटा बदलून मिळणार नाहीत, असं आरबीआयकडून जाहीर करण्यात आलं आहे. यासंदर्भात आरबीआयकडून माहिती प्रसारित करण्यात आली आहे.
जवळपास पाच वर्षांपू्र्वी २ हजाराच्या नोटा बाजारात दाखल झाल्या. त्यानंतर गेल्या वर्षी मे महिन्यात आरबीआयनं रीतसर अधिसूचना काढून २ हजाराच्या नोटा वितरणातून काढल्याचा निर्णय जाहीर केला. त्यामुळे या सर्व घडामोडींवर विरोधकांकडून टीकाही करण्यात आली होती. मात्र, वितरणातून नोटा काढल्या असल्या, तरी त्या बाजारातील व्यवहारांमध्ये वैध चलन म्हणून मात्र कायम राहतील, असं आरबीआयनं स्पष्ट केलं. त्यानंतर या नोटा बदलून मिळण्याची सोय RBI नं उपलब्ध करून दिली होती.येत्या १ एप्रिल रोजी बँकेमध्ये खात्यांचा वार्षिक आढावा असल्यामुळे या दिवशी नोटा बदलून देण्याचं काम पूर्णपणे बंद असेल, असं आरबीआयनं स्पष्ट केलं आहे. २ एप्रिल रोजी पुन्हा ही सुविधा सुरू होईल, असंही बँकेकडून सांगण्यात आलं आहे. अहमदाबाद, बंगळुरू, बेलापूर, भोपळ, भुवनेश्वर, चंदीगड, चेन्नई, गुवाहाटी, हैदराबाद, जयपूर, जम्मू, कानपूर, कोलकाता, लखनौ, मुंबई, नागपूर, नवी दिल्ली, पटना आणि तिरुअनंतपुरम या ठिकाणी ही सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे.दरम्यान, आरबीआयनं २०१९ सालीच २ हजाराच्या नोटांची छपाई बंद केली आहे. ५०० च्या नोटा बाजारात पुरेशा प्रमाणात आल्यानंतर २ हजाराच्या नोटांसंदर्भात हा निर्णय घेण्यात आला. गेल्या वर्षी या नोटा बदलून देण्याचं काम आरबीआयनं सुरू केलं. १ मार्च २०२४ पर्यंत आरबीआयकडे परत आलेल्या २ हजारांच्या नोटांचं प्रमाण जवळपास ९७.६२ टक्के इतकं आहे. त्यामुळे आता बाजारात साधारणपणे एकूण छापण्यात आलेल्या नोटांपैकी अवघ्या २ टक्के नोटाच वितरणात आहेत.