वाळू च्या अवैध वाहतुकीवर पोलिसांची कारवाई
काळ्या वाळूचा काळा बाजार!
अडेगाव मार्गावरून वाळूची होत असलेला अवैध वाहतूक पोलिसांकडून रोखण्यात आली. यात काळ्या वाळूसह तीन टिप्पर जप्त आणि साहित्य असा एकूण ४५ लाख ९५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाईत आठ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून सहा जणांना अटक करण्यात आली तर दोघे फरार आहे. प्रकरणाचा पुढील तपास देवळी पोलिस करीत आहेत.
मारोता बबन वराडे, (वय ४२) रा.पार्डी ता. कळब जि. यवतमाळ, किशोर जानराव मडावी (वय ४०), सचिन वावाराव दरणे, दोन्हा रा. हिवरा दरणे ता.कळंब जि.यवतमाळ, विलास ज्ञानेश्वर भोयर, (वय ३९), चंदन रामदास पाटील (वय ५८), रवींद्र वसंत भानारकर, वावाराव गणपत चुटे (वय ५८) विलास मारातराव फुलमाळी सर्व रा, शिरपूर होरे ता. देवळी जि. वर्धा अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या व्यक्तींनी नावे असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
पुलगाव उपविभागीय पोलिस अधिकारी यांना मिळालेल्या माहिती वरून त्यांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनात आडेगाव मार्गाने पेट्रोलींग करताना आडेगावकडून तीन टिप्पर एकामागे एक येत होते. त्यांना थांबवून तपासणी केली असता त्यात वाळू असल्याचे सांगितले. त्यावरून त्यांना विचारणा केली असता त्यांच्याकडून पास परवाना नसल्याचे पुढे आले. यावरून पोलिसांकडून हा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून तपास सुरू आहे.
महसूल विभाग निद्रिस्त
अडेगाव मार्गावर पोलिसांकडून यापूर्वीही कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर या भागात होत असलेल्या वाळू चोरीवर निर्बंध लावणे अपेक्षित होते. असे असताना महसूल विभागाकडून यावर कुठलीही कारवाई करण्यात आली नाही. महसूल विभागाची या काळ्या वाळू्च्या काळ्या बाजाराला मुकसंमती तर नाही ना असा सवाल करण्यात येत आहे.