अन् ‘मृत’ व्यक्ती पोहोचला मतदान केंद्रावर
रामटेकमधील धक्कादायक प्रकारानं खळबळ
लोकसभा निवडणुकीतील पहिल्या टप्प्यासाठी आज मतदान होत आहे. यामध्ये महाराष्ट्रातील भंडारा-गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली-चिमूर, नागपूर, रामटेक अशा पाच लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे. दरम्यान रामटेक लोकसभा मतदारसंघातील एका मतदान केंद्रातून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जीवंत असलेल्या मतदाराला मतदार यादीमध्ये चक्क मृत दाखवण्यात आलं आहे. पारशीवनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, बूथ क्रमांक 270 वर हा प्रकार घडला आहे. या प्रकारानं खळबळ उडाली आहे. मतदानासाठी गेलेल्या या व्यक्तीला घडलेला प्रकार पाहून जबर धक्का बसला आहे.
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, हा धक्कादायक प्रकार रामटेक लोकसभा मतदारसंघातील पारशीवनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, बूथ क्रमांक 270 वर घडला आहे. राजेंद्र खंडाते असं या मतदाराचं नाव आहे. राजेंद्र खंडाते यांचा मृत्यू झाल्याचं दाखवण्यात आलं होतं. ते जेव्हा मतदानासाठी मतदान केंद्रावर पोहोचले तेव्हा त्यांना हा सर्व प्रकार लक्षात आला. घडलेल्या घटनेनं त्यांना धक्का बसला.त्यानंतर जेव्हा ही चूक मतदान केंद्र अधिकाऱ्यांच्या लक्षात आली तेव्हा त्यांनी या संदर्भात वरिष्ठांची चर्चा केली. दरम्यान आता त्यांचं मतदान हे बॅलेट पेपरवर घेण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. चक्क जिवंत व्यक्ती मृत दाखवण्यात आल्यानं जिल्ह्याभरात हा चर्चेचा विषय ठरला आहे.