स्फोटाने नागपूर हादरले
स्फोटक तयार करणाऱ्या कारखान्यात मोठा स्फोट,
5 जणांचा मृत्यू तर अनेक जण जखमी,
सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
राज्यातील कंपन्यांमधील स्फोटाचे सत्र अजूनही थांबलेले नाही. डोंबिवलीमध्ये महिन्याभरातच दोन केमिकल कंपन्यांमध्ये भीषण स्फोट झाला. आता नागपूरमधील धामना येथील बारुद कंपनीत भीषण स्फोट झाला आहे.नागपूर शहरात स्फोटकं तयार करणाऱ्या कारखान्यात गुरुवारी दुपारी अचानक मोठा स्फोट झाला. या स्फोटावेळी अनेक कामगार फॅक्टरीत होते. सुरुवातीला मिळालेल्या माहितीनुसार, या कारखान्यात काम करणाऱ्या कामगारांपैकी 4-5 जणांचा स्फोटात मृत्यू झाला तर काही मजूर जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने उपचारांसाठी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या आहेत. आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.
कित्येक किलोमीटरपर्यंत धमाक्याचा आवाज
नागपूरमधील धामना परिसरातील चामुंडी बारुद कंपनीत दुपारी दीड वाजता हा भीषण स्फोट झाला. हा स्फोट इतका मोठा होता की, त्याचा आवाज कित्येक किलोमीटरपर्यंत ऐकू गेला. त्यानंतर या फॅक्टरीत भीषण आग लागली. त्याचा धूर कित्येक किलोमीटरवरुन दिसला. स्थानिक लोकांनी तात्काळ या स्फोटाची माहिती अग्निशमन दलाला दिली. या आगीत अडकलेल्या काही कामगारांना बाहेर काढण्यात यश आले. जखमींना रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे.