छत्री तलावात बुडून दोघांचा मृत्यू
ईद साजरी करून गेले होते पोहायला
अमरावती : बकरी ईद साजरी करून छत्री तलावात पोहायला गेलेल्या दोघांचा बुडून मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना सोमवारी दुपारी घडली. शेख उमर लिलगर मेहबूब लिलगर (१९) व अयान शहा राजीक शहा (१६) दोघेही रा. कुंभारवाडा, फ्रेजरपुरा अशी मृतांची नावे आहेत. शेख उमर व अयान शहा हे दोघे बकरी ईद साजरी करून फिरायला छत्री तलाव परिसरात गेले होते. तेथे गेल्यावर ते पोहायला तलावात गेले. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने ते दोघेही बुडाले. हा प्रकार परिसरातील नागरिकांच्या लक्षात आल्यावर त्यांनी याबाबत राजापेठ पोलिसांनी माहिती दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठून जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाच्या शोध व बचाव पथकाला पाचारण केले. पथकाने दोन्ही मृतदेह तलावाबाहेर काढले. त्यानंतर मृतदेहांना शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले. ऐन बकरी ईदच्या दिवशी घडलेल्या या घटनेमुळे दोघांच्याही कुटुंबावर आघात झाला आहे.
एकाच परिसरात राहणारे दोघेही बकरी इद साजरी करून ते पोहण्यासाठी गेले होते. मात्र, दोघांनाही पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने दोघेही बुडाले. ही माहिती मिळताच शोध व बचाव पथक दुपारी दोनच्या सुमारास छत्रीतलाव येथे पोहोचले. तात्काळ बचाव पथकामधील गोताखोरांनी गळ व हुकच्या साह्याने शोधकार्याला सुरुवात केली. अथक प्रयत्नानंतर दोन्ही मृतदेह पथकाच्या हाती लागले. ते मृतदेह पाण्यातून बाहेर काढून शवविच्छेदनाकरीता पोलिसांकडे सुपुर्द करण्यात आले. कुटुंबियांनी मृताची ओळख पटविली.