भारताच्या या कोपऱ्यात 828 विद्यार्थी HIV पॉझिटिव्ह
47 विद्यार्थ्यांचा मृत्यू, धक्कादायक कारण समोर
त्रिपुरा: एचआयव्ही एड्स निर्मूलनासाठी भारतात मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरू आहेत; मात्र एका राज्यातून धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एचआयव्हीसंदर्भात प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार, त्रिपुरामध्ये आतापर्यंत 828 विद्यार्थी एचआयव्ही पॉझिटिव्ह आढळले आहेत. याच राज्यात या भयंकर आजारामुळे 47 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. त्रिपुरा स्टेट एड्स कंट्रोल सोसायटीच्या (टीएसएसीएस) वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत राज्यात 828 विद्यार्थी एचआयव्ही पॉझिटिव्ह आढळले आहेत. यापैकी 572 विद्यार्थी जिवंत असून, 47 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. अनेक विद्यार्थी देशभरातल्या प्रतिष्ठित संस्थांमध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी त्रिपुराच्या बाहेर गेले आहेत.त्रिपुरा एड्स कंट्रोल सोसायटीला 220 शाळा, 24 महाविद्यालयं आणि युनिव्हर्सिटीजमध्ये असे विद्यार्थी आढळले आहेत जे इंजेक्शनच्या माध्यमातून अंमली पदार्थ घेत आहेत. टीएसएसीएसच्या सहसंचालकांनी एएनआयला दिलेल्या माहितीनुसार, 220 शाळा, 24 महाविद्यालयं आणि युनिव्हर्सिटीजमधल्या विद्यार्थ्यांना इंजेक्शनच्या माध्यमातून घेतल्या जाणाऱ्या ड्रग्जचं व्यसन असल्याचं आढळलं आहे. राज्यभरातल्या एकूण 164 आरोग्य सुविधांमधून डेटा गोळा करण्यात आला आहे. अंतिम अहवाल तयार करण्यापूर्वी जवळपास सर्व ब्लॉक आणि उपविभागातून अहवाल गोळा केला जातो.
सहसंचालक म्हणाले, की एचआयव्ही पॉझिटिव्ह आढळलेली बहुतांश मुलं श्रीमंत घरांमधली आहेत. या मुलांचे आई-वडील दोघेही सरकारी सेवेत आहेत आणि मुलांच्या मागण्या पूर्ण करण्यात कसलीही हयगय जात नाही. मुलांच्या पालकांना आपली मुलं ड्रग्जच्या आहारी गेल्याची माहिती आहे; पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता.
सीरिंज शेअर केल्याने संसर्ग
एचआयव्ही/एड्स ही एक महत्त्वाची जागतिक आरोग्य समस्या आहे. ही समस्या इंट्राव्हेनस ड्रग्जच्या गैरवापराशीही संबंधित आहे. ड्रग्ज घेताना सीरिंज शेअर केल्याने एचआयव्हीचा प्रसार होतो. प्रसाराच्या या पद्धतीमध्ये विषाणू ब्लड-टू-ब्लड संपर्काद्वारे पसरू शकतो. यामुळे नवीन एचआयव्ही संसर्ग मोठ्या प्रमाणात होतो. धोकादायक इंजेक्शनचा वापर आणि निर्जंतुकीकरण केलेल्या सीरिंजचा वापर करून त्या एकमेकांशी शेअर केल्याने एचआयव्ही संसर्गाची शक्यता वाढते. कारण, विषाणू व्यक्तीच्या शरीराबाहेरदेखील जिवंत राहू शकतो.