समाजाचे नेते रामदास तडसच असल्याचा तैलिक संघटनेचा ठराव
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर टीकेचा घणाघात करीत प्रदेश तैलिक संघटनेने खासदार रामदास तडस हेच समाजाचे नेते असल्याचे ठरावातून स्पष्ट केले आहे.
वर्धा : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर टीकेचा घणाघात करीत प्रदेश तैलिक संघटनेने खासदार रामदास तडस हेच समाजाचे नेते असल्याचे ठरावातून स्पष्ट केले आहे.खासदार रामदास तडस यांचा गड समजल्या जाणाऱ्या देवळीत प्रांतिक तैलिक समाज संघटनेच्या प्रदेश कार्यकारीणीची बैठक झाली. त्यात राज्यभरातील समाजाच्या सर्व जिल्हा संघटनेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सचिव तसेच प्रदेश पदाधिकाऱ्यांनी हजेरी लावली होती. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे समाजातील अन्य राजकीय नेत्यांचे खच्चीकरन करीत असून समाजाला त्यांचा फायदा काय, असा थेट सवाल झाला. चंद्रशेखर बावनकुळे यांचे नाव न घेता टीकेचे आसूड ओढण्यात आले.
चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर विदर्भात भाजपचे एकही जिल्हाध्यक्षपद समाजाला मिळाले नाही, या जुन्या आरोपाची पुनरावृत्ती झाली. पदावर आल्यानंतर समाजाच्याच नेत्यांना टाळल्या जावू लागले. गावात आल्यावर समाजाच्या नेत्याने बोलावल्यास वेळ दिल्या जात नाही. जेव्हा ‘त्यांच्या’ कडे पक्षाने दुर्लक्ष केले होते, तेव्हा त्यांना समाज आठवला. नंतर परत विसरले. उलट खा.तडस हे समाज संघटनेसाठी झोकून देणारे नेते आहे. अनेक कार्यकर्त्यांना त्यांनी मोठे केले. त्यांना लहान करण्याचा प्रयत्न करीत नंदूरबारच्या एका कुंटुंबास मोठे करण्याचा प्रयत्न होत आहे. हे खपवून घेतल्या जाणार नाही. खा.तडस हेच समाजाचे सर्वमान्य नेते असून त्यांनाच निवडणूकीत प्रतिनिधीत्व मिळावे, अशी अपेक्षा आहे. त्यांना डावलल्यास निवडणूकीत गंभीर परिणाम दिसून येतील असा सणसनीत इशारा प्रदेश नेत्यांनी दिला.