प्रेमीयुगुलाची दुरांतो एक्स्प्रेससमोर उडी
लग्नाला कुटुंबाचा विरोध,
जळगाव हादरलं
कुटुंबाकडून लग्नाला विरोध होत असल्यानं प्रेमीयुगुलानं रेल्वेसमोर उडी घेतल्याची घटना जळगावमध्ये घडली आहे.
जळगावमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे, या बातमीनं खळबळ उडाली आहे. कुटुंबाकडून लग्नाला विरोध होत असल्यानं प्रेमीयुगुलानं रेल्वेसमोर उडी घेतली. या घटनेत तरुणीचा जागीच मृत्यू झाला तर तरुण गंभीर जखमी झाला आहे. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मृत तरुणीचे नाव शितल रामसिंग चव्हाण तर जखमी तरुणाचे नाव सचिन सुगम चव्हाण असं आहे.घटनेबाबत अधिक माहिती अशी की जळगावच्या चाळीसगाव तालुक्यातील बोढरे येथील प्लॅटफॉर्म दोनवर ही घटना घडली आहे. प्रेमियुगुलाने मुंबई-नागपूर दुरांतो एक्स्प्रेससमोर उडी मारली. या घटनेत तरुणीचा जागीच मृत्यू झाला आहे. तर तरुण गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर धुळे येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तरुणीच्या मृत्यूप्रकरणी चाळीसगाव लोहमार्ग पोलीस ठाण्यामध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.