दोन बहिणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून पळवले मध्यप्रदेशातून आरोपी अटक
नागपूर : शहरातील निर्माणाधिन इमारतीच्या बांधकामावर आलेल्या दोन तरुणांनी मित्राच्या दोन्ही बहिणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. घरी कुणी नसताना दोघींनाही मध्यप्रदेशात पळवून नेले. लग्न करून संसार थाटण्याच्या तयारीत असतानाच गुन्हे शाखेने चौघांनाही ताब्यात घेतले. या प्रकरणी सीताबर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. देवा चेतराम गोस्वामी (वय २४) आणि राजू बल्लू गोस्वामी (वय २०) अशी आरोपींची नावे आहेत.
पीडित १७ आणि १९ वर्षीय तरुणी एकमेकींच्या चुलत बहिणी आहेत. त्यांचा भाऊ नागपुरातील निर्माणाधीन इमारतीवर मजुरी करतो. महिन्याभरापूर्वी दोघीही बहिणी भावाकडे राहायला आल्या होत्या. भावाच्या सोबत बांधकामावर काम करणारे भावाचे मित्र राजू आणि देवा हे घरी येत होते. यादरम्यान दोन्ही बहिणीवर त्यांची नजर गेली. दोघांनीही त्यांना प्रेमाच्या जाळ्यात ओढण्याचे ठरविले. त्यामुळे मित्र घरी नसतानाही राजू आणि देवा घरी येऊन त्या तरुणींशी गप्पा करून प्रेमाच्या जाळ्यात ओढत होते. महिन्याभरात दोन्ही बहिणी देवा आणि राजूच्या प्रेमात आकंठ बुडाल्या.
चौघांनीही पळून जाऊन लग्न करण्याचा निर्णय घेतला. २१ फेब्रुवारीला मध्यप्रदेश-शिवनीमध्ये पळून जाऊन लग्न करण्याचे ठरले. नियोजनाप्रमाणे दोघीही बहिणी औषधी आणण्याच्या बहाण्याने घराबाहेर पडल्या. त्यांना पळून जाण्यासाठी मोहन चेतराम गोस्वामी (वय २०),मोंन्टी बल्लू गोस्वामी (वय २०) या दोघांनी मदत केली. दोन्ही मुलींना राजू आणि देवाने पळवून शिवनी शहरात नेले. तेथे एका मित्राची मदत घेऊन त्याच्या घरी मुक्कामी थांबले. दोन्ही बहिणी घरी न परतल्यामुळे भावाने सीताबर्डी पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला. गुन्हे शाखेचे मानवी तस्करी विरोधी पथकाच्या पोलीस निरीक्षक ललिता तोडासे आणि सहायक पोलीस निरीक्षक रेखा संकपाळ यांनी लगेच तांत्रिक तपास करीत आरोपींची माहिती काढली.
लग्नाची तयारी करताना ताब्यात
दोन्ही तरुणींशी राजू आणि देवाने लग्न करण्याची तयारी सुरु केली होती. लग्नासाठी कपडे, दागिने घेऊन ठेवले होते. मात्र, गुन्हे शाखा पोलिसांनी चौघांनाही लग्न करण्यापूर्वीच ताब्यात घेतले. त्यांना नागपुरात आणण्यात आले. दोन्ही तरुणींना भावाच्या ताब्यात देण्यात आले. तर दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली. ही कारवाई सहायक आयुक्त डॉ. अभिजीत पाटील यांच्या मार्गदर्शनात ललीता तोडासे, रेखा संकपाळ, गजेंद्र ठाकूर, सुनील वाकडे, श्याम अंगथुलेवार, दीपक बिंदाने, विलास विंचुलकर, अश्वीनी खोडपेवार, पल्लवी वंजारी,ऋषिकेश डुंबरे, शरीफ शेख यांनी केली.