दिव्यांग पतीने केला कुऱ्हाडीने हल्ला, कापलेला हात घेऊन फरार
मोबाईलवर बोलत होती पत्नी
वैवाहिक जीवनात वाद निर्माण होण्यामागे काही कारणं असतात. संशय हे त्यापैकीच एक कारण होय. जोडीदाराचे विवाहबाह्य संबंध असल्याचा संशय मोठे वाद निर्माण करतो. यातून काही वेळा गंभीर गुन्हे घडतात
.मुंबई : वैवाहिक जीवनात वाद निर्माण होण्यामागे काही कारणं असतात. संशय हे त्यापैकीच एक कारण होय. जोडीदाराचे विवाहबाह्य संबंध असल्याचा संशय मोठे वाद निर्माण करतो. यातून काही वेळा गंभीर गुन्हे घडतात. मध्य प्रदेशात अशाच प्रकारचं एक प्रकरण उघडकीस आलं आहे. एका दिव्यांग व्यक्तीने पत्नीवर संशय घेऊन तिच्यावर कुऱ्हाडीने हल्ला केला. या हल्ल्यात पत्नीचा हात तुटला. घटनेनंतर पती पत्नीचा तुटलेला हात घेऊन फरार झाला.मध्य प्रदेशच्या अशोकनगर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली. पत्नी मध्यरात्री मोबाइलवर बोलत असल्याने तिचा दिव्यांग पती इतका नाराज झाला, की त्याने तिच्यावर कुऱ्हाडीने वार केले. या हल्ल्यात पत्नीचा एक हात तुटून पडला. ती किंचाळू लागली; पण पतीला दया आली नाही. त्याने पुन्हा तिच्या पायावर कुऱ्हाडीचा घाव घातला. नंतर तिचा तुटलेला हात घेऊन पती फरार झाला. गंभीर जखमी असलेल्या या महिलेला कुटुंबीयांनी तात्काळ रुग्णालयात दाखल केलं. सध्या तिची प्रकृती नाजूक आहे. पोलिसांनी याबाबत गुन्हा नोंदवला असून, तपास सुरू केला आहे. पत्नीचा तुटलेला हात पोलिसांनी गावाजवळच्या एका रिकाम्या प्लॉटमधून जप्त केला आहे; पण पती अजूनही पोलिसांच्या हाती लागलेला नाही. या प्रकरणी पोलीस पथकं आरोपीचा कसून शोध घेत आहेत.